Search

पोरक्या बालीने जातांना दिले डोळ्यांचे दान


पोरक्या बालीने जातांना दिले डोळ्यांचे दान .....

‘बाली’ ,तीच इतकाच नाव समजलेलं.वय साधारण ६५-७० च्या दरम्यान.विधर्भातील एका गाव खेड्यात ती एका कोपऱ्यात कुठेतरी पडून राहायची.जवळची सगळी माणस तुटली.आतड्याच म्हणून कुणी नव्हतच.त्या गावातील काही कार्यकर्त्यांनी तिला माउलीत आणून दाखल केलं.येतांना छान नटून बिटून आली होती.तब्यत मात्र खूप खराब.चालता येत नव्हते.शी –शु समजत नव्हती.कमरेखालील भागात विशेष संवेदना जाणवत नव्हत्या.त्यामुळे सारखे कपडे भरायचे.मानसिक दृष्ट्या ती खूप थकलेली होतीच पण शरीरहि साथ देत नव्हते.अर्थात ती सारखी हसतमुख असायची.मला ये राम .....ये राम म्हणून हाका मारायची.

बाली बद्दल आत्मीयता आणि खोल काही तरी वाटण्याच आणखी एक कारण म्हणजे, तिच आयुष्य आणि झालेली अमानवी होरपळ....

तारुण्यात बाली कुणा वासनाधाच्या वासनेची शिकार झाली होती.त्यामधून तिला दिवस गेले.मग पुढे ते बाळ झाले ....नाही झाले कुणाला सांगता येत नाही ...कदाचित झाले असावे आणि कुणी ते घेवून गेले.किंवा जन्मापूर्वीच त्याला संपवले गेले....

त्याविषयी कुणी फारसे सांगत नव्हते ...काही विशेष समजले नाही.पण

बालीवर आलेल्या या गंभीर प्रसंगामधून त्या गावातील अत्यंत बेरकी,आणि जाणत्या माणसांनी आणि तिच्या त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या नातेवाईकांनी असा प्रसंग पुन्हा येवू नये व त्याद्वारे त्या गावाची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी होवू नये म्हणून तिची गर्भ पिशवीच काढून टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि तातडीने तो आमलात आणला.

तिची गर्भपिशवी काढून असा गर्भारपणाचा प्रसंग परत कधी उदभवनार नाही याची काळजी घेत ,अश्या रीतीने तिचा एकप्रकारे लैंगिक सुखासाठी उपभोग घेण्याचा सुरक्षित ? खुला पर्याय समाजापुढे ठेवला गेला.

पुढे सतत तिच्या बरोबर काय घडत होते हे तिला नीटसे कधी कळले नाही.पण तिचे या सततच्या प्रकारामुळे गुप्तांग बाहेर आले.तेथे इजा झाली. हे ती माउलीत आल्यावर आम्हाला दिसले आणि या सर्व प्रकारचा उलगडा झाला.अश्या किती बाली आणि किती त्यांच्या वेदना....

गावोगावी अश्या अभागी बाली असतातच.सगळ्यांना त्या दिसतात पण त्याचं दुख आणि त्या वेदना मात्र जाणवत नाही.कारण आपण सर्व अज्ञात सुखाचा शोध घेत घेत आपापल्या कोशात आणि घरट्यात रमणारे.

खेडी ,तेथील निर्मल वैगरे मनाची माणसे,आपापसात असणारी त्यांची प्रेमभावना इत्यादी इत्यादी गोष्टी फक्त शहरात बसून गावाकडच्या गोष्टी लिहिणाऱ्या लेखकांनाच जाणवणाऱ्या....

वास्तवात हि माणसे अधिक ...अधिक तुटलेली .

बाली या सर्व प्रकाराने तशी उध्वस्त झालेलीच ..तब्येत नरम गरम असायचीच.पण काही दिवसांपासून तीच जेवण कमी झाल.तिला वेगवेगळ्या व्याधीही जडलेल्या.त्यातच म्हातारपण.

माउलीतील महिलांचे नेत्र दानाचे फॉर्म भरण्याच काम मध्ये सुरु होते.बऱ्या असणाऱ्या ६० महिलानी त्यांना नेत्रदाना विषयी माहिती सांगितल्यावर फॉर्म वर सह्या केल्या कुणी आडणी आहेत त्यांनी अंगठा दिला आणि आमच्या मृत्यु नंतर कुणाला तरी दृष्टी मिळेल म्हणून हे करा असे आग्रहाने सांगितले.

बाली ते बघून अंगठा देवू लागली तिला या विषयाबद्दल तासभर समजावून सांगितले तेव्हा तिच्या डोक्यात लक्ख उजेड पडला.मग खाना खुणा करून मला हि हे करयचे पण मी गेल्यावर ....जिवंतपणी नाही बरका असा तिचा भाबडा विचारही मांडला.तिने अंगठा दिला.

आणि बाली चार दिवसापूर्वी आजारी पडली.खूप जास्त झाल.चार दिवस तिला विशेष उपचारासाठी नुकत्याच सुरु केलेल्या विभागात ठेवलं.या काळात माऊली तील भगिनी दिवसरात्र तिची सेवा शुश्रूषा करत .अखेरीस १७/१०/१५ रोजी पहाटे ४.३० वाजता बाली अनंतात विलीन झाली.

तिच्या इच्छे प्रमाणे तातडीने जिल्हा शाशासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला गेला,तिचा देह घेवून मी आणि डॉ.सुचेता जिल्हा शासकीय रुग्णालयात गेलो .

येथे डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या मानकन्ह्या नेत्रपेढी डॉ.हिमांशू मुरलेता व दीपक शिरसूल यांनी हि प्रक्रिया पार पाडली.या वेळी नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे व आम्हाला माऊलीच्या महिलांचे मृत्यु झाल्यानंतर शव विच्चेदना साठी सहकार्य करणाऱ्या सचिन बैइद यांनी खूप मदत केली.

(डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या मानकन्ह्या नेत्र पेढी व जिल्हा शासकीय रुग्णालयाचे या कामा साठी अधिकृत टायअप आहे )

बालीचे शव विच्चेदन झाले आणि .तिचा निष्प्राण देह घेवून मी आणि डॉ.सुचेता अमरधाम मध्ये तिचे अंतिम संस्कार करण्यासाठी गेलो.

बालीला घेवून आम्ही दोघेच होतो.दोघेच तिला उचलून विद्यूत दाहिनीत ठेवत होतो.त्यावेळी तेथे बाजूलाच सरन रचून काही लोकांचे अंत्य संस्कार सुरु होते.गर्दी होती.नातेवाईक होते.आठवणी काढून लोक रडत होते.

बाली साठी रडणार कोणी नव्हत आमच्या शिवाय.पण मी विचार असा करत होतो.माणसे जातात आणि येतात. येताना आणि जातांना काही घेवून येत नाहीत आणि घेवून जातही नाहीत. अश्या रित्या हाताने जाणाऱ्यांसाठी रडायचं असत.बाली तर आयुष्यभर वेदना जगत आणि येथील माणसांच्या खुज्या आत्मकेंद्रित जगासाठी तिचं व्याधीग्रस्त शरीर देत होती.तारुण्यात तिने शरीर दिल.....मग स्रीत्वाचा आधार असणारा अवयव तिची गर्भ पिशवी आणि कदाचित तीच ते मुलहि दिल.

आणि हे सतत वेदना देणार जग सोडताना कुणा अनामिकाला या जगातल्या चांगल्या गोष्टी बघण्यासाठी आपले नेत्रही दिले.

तिला अभागी कस म्हणू.ती तर दातृत्वाचा कळस....

तिला वेडी कस म्हणायचं..ती या जगातल यच्च्यवत शहाणपण कोळून पिलेली.

तिच्या साठी का रडायचं..?

ती गेली नाही ती अमर झाली.अमर तिच्या नेत्रांनी आणि कार्तुत्वानी.

ती देवून गेली.देनारासाठी रडू नको.तिला प्रणाम ...फक्त प्रणाम....

20 views0 comments

Recent Posts

See All