top of page
Search

लढावे तरी किती आणि कुणाशी ?

11/09/2015


आबाजी पठारेनी एका फटक्यात ३ एकर जागा माऊलीला दान दिली खरी ,पण आता इथून पुढे खूप मोठी लढाई सुरु होणार होती.तशी त्याची चुणूक लगेचच आली.

देणाऱ्याने उदारपणे दिले ,पण पुढे या जमिनीवर बांधकाम करायचे असेल तर जमीन बिगरशेती करावी लागते.

मी आणि सुचेता नियोजन तर खूप करत होतो. पण तांत्रिक अडचणी प्रथम दूर कराव्या लागणार हे खूप कंटाळवाणे आणि कसोटी बघणारे.

एक या विषयात काम करणारे सद्गृहस्थ भेटले ,ते म्हणाले जमीन बिगरशेती करायची असेल तर किमान “वरचा खर्च” दीड लाख अधिक बाकीचा फिया वगेरे आणि त्यांची फी वेगळी इत्यादी इत्यादी..

आता आधीच लोकांनी आमच्या झोळीत टाकलेली दानाची रक्कम तोकडी,त्यात हि रक्कम ,दान हे माऊली मध्ये राहणाऱ्या पोरक्या माय भगिनीचे. या माय भगिनीच्या ताटात वाढलेल्या या अन्नावरही डोळा ठेवणारी सरकारी नोकरांची आणि त्यांच्या दलालांची टोळी.बेमालूम फसवून भक्ष्याला मारणाऱ्या रानकुत्र्यांच्या टोळ्या अश्याच...

हे अस वरच आणि खालचं देन काही आपल्याला श्यक्य नाही .मग काय करावे?

बर हे काम काय माझ्या घराचे,हॉटेलचे किंवा पैसे मिळवून देणाऱ्या कुठल्या धंद्याचे नाही.

समाजाचे ,समजाच्या स्वयंकेंद्रितपणा मुळे निर्माण झालेल्या समस्येसाठी उभे केलेले हे काम.

जमिनीची सरकारी मोजणी आधी करून घेतली.म्हणजे ती तशी करून घ्यावी लागते असे काही त्यातील मुरलेल्या लोकांनी सांगितले.मोजणी करण्यासाठी “अतितातडीचे” या प्रकारची फी भरली. मग दीड दोन महिन्यांनी त्यासाठी दोन कर्मचारी आले.शिरस्त्याप्रमाणे आणि मी डॉक्टर असल्याने त्याना सुरुवातीला नेहमीप्रमाणे वाटले..डॉक्टर असण्याचे काही फायदे आहेत तर बरेचशे तोटे हि आहेत.सर्वात महत्वाचा समज किंवा गैरसमज असतो कि सगळ्या डॉक्टर लोकांकडे दाबून पैसा असतो....त्यामुळे कुठल्याही कामात मग डॉक्टर कडून अपेक्ष्या वाढतात..! तसे ते खरे हि असेल .पण आमच्या सारखे वाऱ्यावर प्रपंच करणारे डॉक्टर मात्र गैरसमजाने भरडले जातात.

मी विंनती करून प्रथम त्यांना माऊली मध्ये बोलावले.ते बिलकुल वेळ नाही असे म्हणत असतानाहि त्यांना विंनती करून माउलीचे काम दाखवले. नंतर मात्र सगळे बघितल्यावर त्यांनी काहीही कुरकुर न करता मोजणी केली आणि ते गेले.

मोजणी पत्रक “क पत्र” (नावही मोठे गमतीदार.क पदार्थ तसे क पत्र) काही लवकर मिळेना म्हणून मग मी आणि सुचेता त्या कार्यलयात गेलो. क पत्र मिळाले पण त्यावर पूर्ण सर्व्हे नंबरची मोजणी दाखवलेली .

फोड वगैरे करून दाखवलेले नाही. म्हणून त्याविषयी माहिती घ्यावी,झालीच तर वरिष्ठ अधिकार्याने काही मदत केली तर होयील या भाबड्या आशेने या कार्यालयाच्या मुख्य टी एल आर  बाईनां भेटण्यासाठी त्यांच्या दारात उभे राहून आत येवू का म्हणून परवानगी मागितली तर अपचन झाल्या सारखा चेहरा करून त्यांनी माझ्याकडे बघितले. कामात नव्हत्या पण आत घेयीनात.धीर करून आत गेलो व माझा परीचय दिला.त्यांच्या चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव. मी त्यांना माऊली च्या कामाविषयी ,या दान मिळालेल्या जमिनी विषयी सांगू लागलो.मला वाटले महिला अधिकारी आहे.वंचित महिलांच्या विषयी काम आहे किमान या बायी ऐकतील नेमकी माझी काय अडचण आहे ते समजावून काही मार्गदर्शन करतील तर त्यांनी अत्यंत हिणकस पणे बाहेर जा म्हणून सांगितले.बेल दाबून दुसऱ्या कुणालातरी आत बोलावले. मी हात जोडून विंनती करतच होतो.त्या थंडपणे म्हणाल्या एकदा सांगतल ना जा म्हणून निघा परत अर्ज करा ..निघा.

मी अस्वस्थ झालो.टचकन डोळ्यात पाणी आले.

मी जीवतोडून या बायीला माझा प्रश्न सांगतोय आणि ती काहीही ऐकून घेत नाही. माजोरडेपणा किती असावा?

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्ष्या देवून TLR झालेल्या व्यक्तीला लोकसेवा या विषयाचा गंधही नसावा आणि सामाजिक भानही नसावे.

मला माझा अपमान नाही वाटला ,तो सहन करत आहोतच .पण आम्ही जे इवलस काम उभ करतो आहोत त्याविषयी हिणकस भावना असणारी माणस आढळली कि मन अस्वस्थ होत. का करायची आपण हि कामे?

कुणी आवतन धाडल होत आपल्याला. मी आणि सुचेता दोघेही नियमित आयकर भरतो.सरकारी कायदे आणि चौकटीत स्वतःला सावरत जगतो.मी सरकारला भरलेल्या करामधून हा माजलेला लोकसेवक पगार घेतो.

त्याला समोर आलेल्या माणसाशी कस बोलाव हे हि समजत नाही.माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्या ऐवजी एखादा त्यांचा दलाल,किंवा राजकारणी पुढारी गेला असता तर त्याच्याशी हे लोक कसे वागले असते?

मला आठवला कालचा प्रसंग,

सरोजिनी आजी वारली .पहाटे,पहाटे.पोलिसांना खबर दिली तर ते म्हणाले ११ वाजता पंचनामा करू मग पोस्टमारटेम. तिचा निष्प्राण देह स्वच्छ करून ठेवला .सकाळची वेळ बाकी महिलांना चहा हवा ,नाश्ता हवा तो दिला .

परवा पासून ती अस्वस्थ होती.

सारखे कपडे भरवायची.कपड्यात शी शु व्हायची.डायपरही ती ठेवायची नाही.

तोंड उघडायची नाही.बळेच तोंड उघडून भरवाव लागे.

परवा असे भरवताना प्रचंड दुर्गंधी आली.

हातात ग्लोव्ज घालून तोंडात हात घातला तर तोंड पूर्ण सडलेले.

इतके सडलेले तोंड मी बघितले नव्हते कधी. या पूर्वी बकरी मावशी नावाची रुग्ण होती. ती कधी बोलायची नाही सारखी बकरी सारखी बे..बे.. करायची ...म्हणून सगळे तिला बकरी मावशी म्हणत. ती कधी तोंड उघडतच नसे. तोंड सडले होते ते कधी बघता आले नाही पण तिच्या तोंडा मधून अक्षरशः किडे पडायचे..... वेगवेगळी जंतुनाशक द्रव्ये वापरून तोंड स्वच्छ केले खरे पण वरचा पापुद्र किंवा म्युकोसा गेल्याने रक्तस्राव सुरु झाला.

कसा तरी तो थांबवला.

नंतर ती गेली .पूर्वी बकरी मावशी हि अशीच गेलेली.

तर मग माउलीतील सगळे आवरून मी आणि सुचेता दोघेच सरोजीनीची डेड बॉडी रुग्णवाहिकेत घेवून निघालो.

 मी ड्रायव्हर आणि सुचेता मदतनीस.

सरकारी रुग्णालयात गेलो तर बिचारे पोलीस दादा आले होते. ते म्हणाले डॉक्टर बाजूच्या झेरॉक्स दुकानातून पंचनाम्याचे कोरे फॉर्म आणता का ? बिचारे दोघेही रात्र पाळी करून आलेले.

मी रुग्णवाहिका  उभी करून फॉर्म आणले.

मग रुग्णवाहिका  घेवून दोघेही पोस्टमारटेम विभागाकडे गेलो.

गर्दी होती. आज बऱ्याच डेडबॉडी आलेल्या.

मग आपला नंबर कधी येतो याची वाट बघत मी आत उभा राहिलो.

सुचेता बाहेर होती. नुकतीच तिच्या एम आर आय तपासणीत कमरेच्या मणक्यातील चकती थोडी गडबड करत असलेली दाखवलेले. त्यामुळे तिला उभे राहून पायात प्रचंड वेदना होत. मग तिने सरळ पोस्टमार्टेम विभागाचे बाहेर मातीत बसकण मांडलेली.

तिला तस बसलेल बघून मला भडभडून आल.

आपल्या या सामाजिक कामाच्या वेडापायी तिलाही खूप त्रास होतो.पण तिने याबद्दल कधीच कुरकुर केली नाही.

ती शांतपणे येणारे जाणारे लोक न्याहाळत बसलेली.

तिच्या लेखी हे सगळ अत्यंत नॉर्मल .

पोस्ट मार्टेम करणारा सचिन आता चांगलाच ओळखीचा झालेला.त्याने सहकार्य करत लवकर प्रक्रिया पार पडली.

त्याला पाचशे रुपये दरवेळेस द्यावे लागतात. तो मागत नाही पण त्याला अपेक्ष्या असते.

मी पण देतोच.अत्यंत प्रतिकूल ,घाणेरड्या वातावरणात त्याला हे काम करावे लागते त्यामुळे आणि त्याच्या कामातील कठीणपणाची झलक आमच्या कामातआम्हाला नेहमी बघायला मिळते म्हणून त्याच्या कामाविषयी व त्याच्या विषयी ममत्व वाटते.

असो.

मी आणि सुचेताने सरोजिनी आजीचा देह रुग्णवाहिकेत  ठेवला आणि निघालो.

तिच्या निजधामाला तिला पोचवायला हवे.

अमरधाम हि नगर मधील स्मशानभूमी जवळच.

दिल्ली गेट वरून जाताना एक फुलवाला आहे .आमची रुग्णवाहिका त्याच्या टपरीजवळ थांबली कि तो लगबगीने हार फुले घेवून येतो.गाडीत कुणाचीतरी मयत आहे हे तो लगेच ओळखतो.

तसा तो काल कि आला आणि हार फुले दिली.

पुढे अमरधाम मध्ये फोन करून ठेवलाच होता. योगायोगाने विद्युतदाहिनी चालू झाली होती.

तिथे कुणी मदतीला नव्हतेच .मग दोघानीच तो देह घेवून विद्यूत दाहिनीत ठेवला आणि अंत्यसंस्कार पार 


पडले. या पूर्वी लाकडे रचून सरण तयार करताना आम्ही दोघे किंवा बरोबर माउलीतील एखादी बरी झालेली 


माऊली असते.अश्या दोनतीन लोकांना कुणाचे सरण रचून अंत्यसंस्कार करताना बघणे आजुबाजुच्या लोकांना 


वेगळेच विपरीत वाटायचे,


अजूनही वाटते.

विद्युत दाहिनी चालू नसेल तर मात्र सरपण आणून सरण रचणे आणि पूर्ण ज्वलन होइपर्यंत तिथे वेळ जातो.

मी हा विचार करतो कि जे काही आपण करतो आहोत ते जगावेगळे किंवा काही महान बिहान तर बिलकुल नाही .

जीवन नश्वर आहे हे सत्य वाचणे किंवा ऐकण्यापेक्ष्या अनुभवणे आमच्या दृष्टीने या जगाच्या पाठशाळेत शिकणे आहे.

पण जेव्हा या वंचितांच्या कामात असे मानवी संवेदना आणि विचार संपलेली माणसे भेटतात तेव्हा अस्वस्थता येते. तीव्र नैराश्य ग्रासते.

मी TLR बायींच्या वर्तनाने खूप नाराज झालो. हे असेच चालू राहिले तर मनगाव कसे पुरे होणार,रस्त्यावरील बिनचेहर्यांच्या माणसांना त्याचं हक्कच घर देण्याच हे स्वप्न कसे पुरे होणार असे प्रश्न पडतात.

सुचेता मला म्हणाली,डॉक्टर आपण त्या TLR बाई साठी काम करत नाहीत. कसायाला विकलेल्या

 गायीला या समाजात गो शाळेच्या रूपाने घर मिळते तिला विकणारा माणूसच असतो....तिच दुध पिवून ती बिनकामाची झाल्यावर तिची विल्हेवाट लावणारा हाच माणूस असतो .पण माणूस म्हणून जन्माला आलेल्या आणि अनंत यातना भोगणाऱ्या वेड्या, मन हरवलेल्या आणि शरीराच्या चिंध्या झालेल्या बायीला मात्र घर मिळवून देण्यात किती अडचणी.पण हे आपल्याला करावेच लागेल दुसरे कोण करणार. आपापल्या डोळ्यांना झापड बांधून चालणारी आप्पलपोटी माणस कधीतरी मानवी पातळीवर येतील. मानवी जन्मच्या व्यथा वेदना नजरेसमोर असल्या कि तुच्छतेची,स्वमग्न्तेची आणि पैश्याच्या माजोरडे पणाची सूज मानवी मनावर येत नाही.

असे अनुभव खूप.सरकारी अधिकाऱ्यांचे,वैदयकीय व्यावसायिक मित्रांचे , मंत्र्यांचे ,पुढार्यांचे, स्वतःला खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते समजणाऱ्या नट नट्यांचे आणि खुद्द नाव असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचेहि.....पण ते शिकवून गेलेले. कुणा विषयी कडवटपणा बिलकुल नाही.

या खडतर मार्गावरचा प्रवास आम्हीच निवडला तो आम्हीच पुरा करू.

   


3 views0 comments

Comments


bottom of page